solapur

नागरिक त्रस्त,प्रशासन सुस्त !

वर्दळीच्या पटेल समोरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

अकलूज शहरातील जुने एसटी स्टँड परिसरामागील पटेल  येथील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, मोठमोठे खड्डे,आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. शहरातील वर्दळीच्या आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या भागातील या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष अकलूज शहराच्या वतीने रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.भाजप अकलूज शहराचे सरचिटणीस अमोल माने यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन देत रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न आक्रमकपणे मांडला. “सर्वसामान्य नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असताना प्रशासन आणखी किती दिवस डोळेझाक करणार असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.पटेल समोरील रस्ता हा अकलूजमधील महत्त्वाचा व्यापारी परिसर आहे. या भागात विविध दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना असल्याने दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांचीही या मार्गावर मोठी ये-जा असते.मात्र, सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठी गैरसोय होत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यानंतर खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनत आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, किरकोळ अपघातांची शक्यताही वाढली आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका भाजपकडून व्यक्त करण्यात आली.
पटेल बोळातील नागरिक आणि व्यापाऱ्यांची समस्या ही अत्यंत गंभीर असून ती न्याय्य आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा भाजप पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माने यांनी दिला.

मा.आ.राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन  देण्यात आले आहे. रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन काम सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी अकलूज शहर भाजपचे उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, शहर सरचिटणीस अमोल माने, युवा मोर्चा उपाध्यक्ष जतिन वायदंडे, विक्रम देशमाने, शशिकांत ननवरे, समर कोतमिरे, अभिषेक चाबुकस्वार आणि रोहित कुलकर्णी उपस्थित होते.रस्ता दुरुस्तीचा प्रश्न आता प्रशासन किती गांभीर्याने घेते आणि प्रत्यक्ष काम कधी सुरू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button