नेते,उमेदवार ‘ऑक्सिजन’ वर फक्त निकालाचीच चर्चा निकाल अटीतटीचा असल्याने गंभीर वातावरण कोणीही ठामपणे सांगत नाही

नेते,उमेदवार ‘ऑक्सिजन’ वर फक्त निकालाचीच चर्चा
निकाल अटीतटीचा असल्याने गंभीर वातावरण कोणीही ठामपणे सांगत नाही
संचार वृत्त अपडेट
येत्या २१ तारखेला अकलूज नगर परिषदेचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर आता निकालाची तारीख जवळ आल्याने रिंगणातील उमेदवार नेतेमंडळी कार्यकर्ते ‘ऑक्सिजन’ वर असून नगराध्यक्ष पदासाठी झालेली तिरंगी लढत आणि २६ जागासाठी असलेले नगरसेवक या उमेदवारांचे भवितव्य आता मतदार यंत्रातून बाहेर येणार असल्याने संपूर्ण अकलूज शहरात निकालाबद्दल उत्साह आणि चिंता असे संमिश्र वातावरण आहे.
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट,राष्ट्रवादी शरद पवार गट,यांच्यात मुख्य चुरस पाहायला मिळाली. सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार यावर सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीपर्यंत फक्त तर्क-वितर्क लढवले जात आहेत.नगराध्यक्ष पदासाठी चुरस झाल्याने मतांचे विभाजन कोणाला तारणार कोणाला मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.नगरसेवक पदासाठी १३ प्रभागातील २६ उमेदवार निवडून येणार आहेत.प्रत्येक प्रभागातील गणिते वेगळी असल्याने निकालाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.निवडणूक संपल्यापासूनच कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या विजयाचे दावे करत आहेत.मात्र जसजशी २१ तारीख जवळ येत आहे.तशी तशी ही खात्री चिंतेत बदलताना दिसत आहे. निकालाचा नेमका अंदाज येत नसल्याने उमेदवार,नेते,त्यांचे कट्टर समर्थक, पत्रकार सध्या ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. शहरातील प्रमुख चौक, नाके आणि सार्वजनिक ठिकाणी, प्रसिद्ध मोहिते चहा येथे फक्त निकालाचीच चर्चा सुरू आहे. या चर्चेत जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, दिव्य मराठी चे पत्रकार भारत मगर, बारामती झटका चे संपादक व दै.तरुण भारत चे माळशिरस प्रतिनिधी श्रीनिवास कदम पाटील, आमदार उत्तम जानकर यांचे खंदे समर्थक साजिद सय्यद व अकलूज येथील मतदार यांच्यात निकाला बाबतीत चर्चा झाल्याची पहावयास मिळाली. कोणत्या प्रभागात कोण आघाडी घेणार आणि नगराध्यक्ष कोण होणार या प्रश्नांनी सर्वसामान्यांनाही ग्रासले आहे. एकमेकांना फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटून अंदाज अटीतटीचा असल्याने कोणीही ठामपणे सांगण्यात तयार नाही. त्यामुळे आता सर्वांचे डोळे २१ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहेत.अकलूजचा नवा कारभारी कोण ठरवणार याचा फैसला त्यावेळी होणार आहे.



